ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीत आगडोंब!

बारणे यांच्या आरोपांवर आमदार शेळके यांचा जोरदार पलटवार

लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीत बंडाळी!; दिवसा धनुष्य बाण अन् रात्री मशाल 

पिंपरी : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर थेट केलेला आरोप आणि राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पलटवाराने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीमध्ये भडका उडाला आहे. या आरोप-प्रत्यारोपाचे पडसाद आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभेची निवडणूक जाहीर होताच बारणे यांच्याविरोधात महायुतीच्या नेत्यांनीच आघाडी उघडली होती. बारणे यांनी मतदारसंघात काहीच काम केले नसल्याचा आरोप करून आमदार शेळके यांनी टोकाची भूमिका घेतली. याचवेळी संपूर्ण मतदारसंघात भाजपची ताकद अधिक असल्याने उमेदवारी खेचण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे बारणे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागला. मित्रपक्षांची मनधरणी करण्यात कालावधी गेल्याने बारणेंची उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला. तोवर माजी महापौर व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. पिंपरी व चिंचवडमधील मतदारांना लक्ष्य करून त्यांनी नात्यागोत्याला साद घातली.

दरम्यान, बारणे यांच्यासमोर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना मनविण्याबरोबरच प्रचारात आघाडी घेण्याचे आव्हान उभे राहिले. यासाठी मित्रपक्षाच्या नेत्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. सिनेस्टार गोविंदा सारख्या स्टार प्रचारकाचा रोड शो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोनदा प्रचारात उतरावे लागले.

प्रचारावेळीही खदखद!
बारणे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी टोकाची भूमिका घेत बारणे यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी देखील भाजपा उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला होता. मात्र बारणे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शेळके आणि भेगडे यांनी युतीचा धर्म पाळत बारणे यांचा जोमात प्रचार केला. मात्र पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली, अशीदेखील चर्चा झाली होती. त्यामुळे युतीत खदखद पहायला मिळाली.

दिवसा धनुष्य बाण अन् रात्री मशाल 
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा युतीचा धर्म म्हणून आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे व पक्षातील नेते मंडळींनी प्रचार केला असला तरी  अनेक ठिकाणी सर्व पक्षातील काही नेत्यांसह कार्यकर्त्यानी दिवसा धनुष्य बाण आणि रात्री मशाल असे काम केल्याची चर्चा आहे. तालुक्यात तशी शिंदे शिवसेना गटाची ताकत नगण्य आहे. भाजप, व राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जे काय मतांचे लिड मिळेल हे दोन पक्षामुळेच. मावळ तालुक्यात जर बारणे यांना मताधिक्य मिळाले नाही तर निकालानंतर ओरोपप्रत्या-आरोपांच्या फैरी सुरू होणार.

महायुतीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह
लोकसभेच्या निकालानंतर तीन ते चार महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेवर विधानसभेच्या उमेदवारीची गणिते अवलंबून आहेत. लोकसभेतील मतदानाच्या आकड्यांवरून इच्छुकांची पोलखोल होणार आहे. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच महायुतीतील बंडाळी पुढे आली आहे. भाजपने सहाही मतदारसंघांतून आपला प्रचार केल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले आहे. मावळमधील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार केला नाही. मात्र बारणेंचे काम करूनही अशा प्रकारे आरोप करणे योग्य नाही. शेळके यांनी बारणेंच्या लोकप्रियतेवरच पुनश्च प्रश्न उभे करून बारणेंच्या प्रचाराचा समाचार घेतल्याने महायुतीमध्ये आता भडका उडाला आहे. लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये इच्छुकांचे रुसवे-फुगवे, नाराजीनाट्य पाहत विधासभेमध्ये महायुती टिकणार का? असा सवाल केला जात असतानाच बारणे विरुध्द शेळके यांच्यातील वाक् युद्धामुळे महायुतीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button